मुंबई : वाढीव वॉर्डांसह मुंबईतील प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा निश्चित करणे आणि बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जारी केला आहे. त्यानुसार 2 मार्चला अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे मार्च आणि एप्रिलमधील शाळा-कॉलेजच्या परीक्षा संपल्यानंतर एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्यात राज्यातील 20 महापालिकांच्या निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कालावधी 8 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात निवडणूका होतील, अशी शक्यता होती. मात्र, प्रारुप आराखडा अंतिम करणे, बहुसदस्यीय प्रभागांच्या सीमांकनाची प्रक्रियाच 2 मार्च पर्यंत चालणार आहे. हा टप्पा पार पडल्यानंतर राज्यातील महापालिकामधील आरक्षणाची सोडत जाहीर करणे आणि अचारसंहिता लागू करणे असा कार्यक्रम असतो. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणूका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांकानुसार 1 फेब्रुवारीला प्रारुप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्याचा कालावधी आहे. 26 फेब्रुवारीला या हरकती-सूचनांवर सुनावणी होईल. 2 मार्चला यासंदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. मुंबई-ठाणे आणि इतर महापालिकांसाठी असाच कार्यक्रम असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्के निश्चित करुन ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारने या मर्यादेत 27 टक्के आरक्षणाचा निर्णय दिला. परंतु, इम्पिरिकल डेटाशिवाय आरक्षण देता येणार नसल्याचे सांगत न्यायालयाने हा निर्णय देखील फेटाळून लावला. त्यामुळे सुनावणी नंतर ओबीसी आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
विद्यमान नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी निवडणूक होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिकेतील प्रशासकांची नेमणूक केली जाणार की नगरसेवकांना मुदतवाढ दिली जाणार, याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे. सध्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि पनवेल या महापालिकांमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई (8 मार्च 2022), ठाणे (5 मे 2022), नवी मुंबई (8 मे 2022), कल्याण-डोंबिवली (10 नोव्हेंबर 2020), पुणे (14 मार्च 2022), पिंपरी-चिंचवड (13 मार्च 2022), नाशिक (14 मार्च 2022), औरंगाबाद (28 एप्रिल 2022), नागपूर (4 मार्च 2022), पनवेल (9 जुलै 2022), वसई-विरार (27 जून 2020), कोल्हापूर (15 नोव्हेंबर 2020), भिवंडी-निजामपूर (8 जून 2022), उल्हासनगर (4 एप्रिल 2022), सोलापूर (7 मार्च 2022), परभणी (15 मे 2022), अमरावती (8 मार्च 2022), अकोला (8 मार्च 2022), चंद्रपूर (28 मे 2022), लातूर (21 मे 2022). जर महापालिकांच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये झाल्या,
तर जून-जुलै महिन्यात मुदत संपणाऱ्या महापालिकांचा यामध्ये समावेश होणार का, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
राज्य मंत्रिमंडळाने मुंबईतील वॉर्डांची संख्या वाढवणे आणि अन्य महापालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कायदेशीर दुरुस्त्या पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग नव्याने सीमांकन, प्रारुप आराखड्याचा कार्यक्रम निश्चित करणार आहे.