कुख्यात गजा उर्फ गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याची मिरवणूक काढली. या प्रकरणी पहिला गुन्हा तळेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. तसेच गजा मारणे सह त्याच्या साथीदारांना अटक केली. पहिल्या गुन्ह्यात गजा मारणे याला जामीन मंजूर झाला.
पोलिसांनी त्यानंतर वेगवेगळे गुन्हे दाखल केले. तसेच त्याच्या समर्थकांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली. तसेच त्या मिरवणुकीत असणारी वाहने जप्त केली. अजूनही धरपकड सुरूच आहे. मात्र या मध्ये गजा मारणे याचे अनेक समर्थक पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील असल्याचे समोर आले आणि ही शहरासाठी धक्कादायक बाब आहे.
शहरात निगडी, आकुर्डी परिसरात वर्चस्वाच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. याच बरोबर पिंपरी परिसरात वाहनांची तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. अधून-मधून या संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या डोके वर काढत असतात. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली जाते आणि पोलिसांचे नाव खराब होते.
शहरातील गुंडगिरीच्या मुसक्या आवळण्यासाठी आणि टोळ्या नष्ट करण्याचे पोलीस आयुक्तांनी ठरवले आहे. यासाठी त्यांनी स्वतंत्र गुंडा विरोधी पथक (गुंडा स्कॉड) याची स्थापना केली आहे. या पथकाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास माने यांच्याकडे दिलेली आहे. हे पथक गुन्हे शाखा युनिट दोन सहायक पोलिस आयुक्त यांच्या अधिपत्याखाली काम करणार आहे.