अखेर ‘सर्व्हीस’ रस्त्याचे खड्डे मुजवण्यास सुरुवात
सामाजिक कार्यकर्ते नवनाथ ढवळे यांच्या पाठपुराव्यास यश
पिंपरी : शहरात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था अनेक रस्त्यांची झाली होती. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले.
पुनावळे, वाकड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ ढवळे यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सर्व्हीस रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाहन चालकांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. तसेच तत्काळ रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली.
ढवळे यांनी दिलेल्या निवेदनाची अधिकाऱ्यांनी दखल घेत, सर्व्हीस रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे वाहन चालकांना होणारा मनस्ताप कमी होणार आहे. तसेच वाहनांचे होणारे नुकसान टाळता येणार आहे.