या परीक्षांमध्ये एकूण ६० एमसीक्यू प्रश्न विचारण्यात येणार असून, त्यापैकी कोणतेही ५० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागणार आहेत. या प्रश्नांसाठी एक तासाचा अवधी देण्यात आला आहे. या परीक्षा केवळ ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्यांना मोबाइल, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटर आदी कोणत्याही माध्यमाद्वारे ही परीक्षा देता येणार आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतर्गत आवश्यकतेनुसार महाविद्यालयस्तरावर प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.
या परीक्षांचे वेळापत्रक येत्या २५ मार्च रोजी विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव व्हावा, यासाठी सात एप्रिलपासून सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी परीक्षा समन्वय कक्ष महाविद्यालयांना स्थापन करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रथम व द्वितीय सत्रातील प्रॅक्टिकल, मौखिक परीक्षा, सेमिनार, मिनी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आदींचे आयोजन संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा प्रथम सत्राचा शेवटचा पेपर झाल्यानंतर महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करावे, यासाठी स्वतंत्र परिपत्रक काढले जाणार नाही, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.