मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यभरातील १८ महापालिकांची मुदत संपवून निवडणुका घेण्याचे वेळापत्रक जेमतेम साडेचार महिन्यांवर आल्याने या निवडणुकांसाठी प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आज मंगळवारी (ता. २१ सप्टेंबर) होणार आहे. त्यानंतर लगेचच बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होऊन प्रभाग पद्धती ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई वळगता पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूरसह काही महापालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग राहणार असल्याचेही जवळपास निश्चित मानले जात आहे. राज्यात मुदत संपलेल्या आणि येत्या फेब्रुवारीपर्यंत (२०२२) मुदत संपणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यांत दिला.
ही रचना सरकारच्या ३१ डिसेंबर २०१९ च्या काद्यानुसार एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल आणि तशीच प्रभागरचना करण्याची सूचना आयोगाने महापालिका आयुक्त केल्या आहेत. पण, सर्वच महापालिकांसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धती नसेल, त्यात काही बदल होईल आणि त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २० दिवसांपूर्वी सांगितले आहे.
दुसरीकडे, प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याची कामे महापालिकांच्या पातळीवर सुरू असतानाच प्रभाग पद्धतीत बदलाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या कामात अडचणी आल्या आहेत. तर प्रभाग नेमका कसा असेल, यावरून राजकीय पक्ष आणि त्यांच्याकडील इच्छुकही गोंधळे आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकांची मुदत, त्याआधीची आचारसंहिता आणि राजकीय पक्षांच्या पातळीवरील तयारीसाठी वेळ पाहता प्रभाग रचना ठरविण्याचा मुहूर्त लागला आहे. नव्या प्रभाग पद्धतीसाठी तीनही पक्षांच्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.