मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन करण्यात आलेला आहे.मात्र यातून उद्योगांना सूट देण्यात आली असल्याचे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
शनिवारी-रविवारी लॉकडाऊन संदर्भात अनेक उद्योजक संभ्रमावस्थेत आहेत. उद्या कंपन्या चालू आहेत का बंद याविषयी अनेक उद्योजकांकडून विचारणा होत आहे. परंतु आयुक्त आणि जिल्हा उद्योग केंद्र क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार पूर्वीच सरकारच्या जाहीर केलेल्या नियमावलीनुसार उद्योगांना सूट देण्यात आलेली आहे. एमआयडीसी परिसरातील सर्व कारखाने या काळामध्ये सुरु ठेवावेत.
तसेच उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीची ओळखपत्र दिल्यास त्यांना जाण्या-येण्यासाठी या काळामध्ये सूट मिळू शकेल, याची दखल सर्व उद्योजकांनी घ्यावी, असे आवाहन फॉर्म ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. उद्योग सुरू ठेवण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जाणवल्यास त्यांनी इंडस्ट्रीज असोसिएशनशी संपर्क साधावा असे असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.