नवी दिल्ली : एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला आज झटका बसला आहे. गॅस सिलेंडर आजपासून 100 रुपये महाग झाला आहे. लोकांना अपेक्षा होती की, पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत होणार्या विधानसभा निवडणुका पाहता मोदी सरकार पेट्रोल-डिझेलप्रमाणे गॅससुद्धा स्वस्त करेल. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की, ही वाढ कमर्शियल सिलेंडरमध्ये झाली आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी ही वाढ कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत केली आहे. मागील महिन्यात हा सिलेंडर 266 रुपयांनी महागला होता आणि आता यामध्ये 100 रुपयांची वाढ केली आहे.
कमर्शियल सिलेंडरचे दर
आजसुद्धा दिल्लीत कमर्शियल सिलेंडर 2100 रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी हा 1733 रुपयांचा होता. मुंबईत 19 किलोचा सिलेंडर 2051 रुपयांचा झाला आहे. तर कोलकातामध्ये 19 किलोचा इण्डेन गॅस सिलेंडर 2174.50 रुपये झाला आहे. चेन्न्ईमध्ये आता 19 किलोच्या सिलेंडरसाठी 2234 रुपये खर्च करावे लागतील.
घरगुती एलपीजी सिलेंडर ग्राहकांना दिलासा
दिल्लीत 14.2 किलोचा विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 899.50 रुपयांना मिळत आहे. आज यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. 6 ऑक्टोबरला यामध्ये वाढ झाली होती.
तारीख – 1 डिसेंबर 2021 (14.2 किलोचा विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर)
– दिल्ली – 899.5
– मुंबई – 899.5
– कोलकाता – 926
– चेन्नई – 915.5