भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या देशी लसीला तज्ज्ञांची मान्यता
नवी दिल्ली ः शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीला आपतकालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर हैदराबाद येथील ‘भारत बायोटेक’ने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मदतीने तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीलादेखील केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने आपतकालीन वापरासाठी मंजूरी दिलेली आहे.
कोव्हॅक्सीन ही लस देशी लस आहे. भारत बायोटेकने शनिवारी या लसीबद्दल पुन्हा तज्ज्ञसमितीपुढे प्रेझेंशटेशन केले, त्यानंतर तज्ज्ञ समितीने लसीच्या अतिरिक्त वापरासाठी मंजूरी देऊन अंतिम वापराची शिफारस केलेली आहे. ७ डिसेंबर रोजी कोव्हॅक्सीनच्या आपतकालीन वापरासाठी भारत बायोटेकने डीसीजीआयकडे अर्ज केला होता.
“सीडीएससीओच्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारीच ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या आणि पुण्यातील ‘सीरम’ संस्थेने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लशीच्या वापरास मंजुरी देऊन तशी शिफारस ‘डीसीजीआय’ यांच्याकडे केली होती. लसीकरण सुरू करताना करोना प्रतिबंधक उपाययोजना सुरूच राहतील, त्यांबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही आणि पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्याचबरोबर आघाडीवर काम करणाऱ्या दोन कोटी कर्मचाऱ्यांचे विनाशुल्क लसीकरण करण्यात येईल”, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्ष वर्धन यांनी दिली.