पिंपरी : चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. गुंडा विरोधी पथकाने खुनाचे गूढ उकलले असून आरोपीला अटक केली आहे.
लक्ष्मण देवासी (8, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. देवासी याच्या घराजवळ राहणाऱ्या आणि चार दिवसांपूर्वी परिसर सोडून गेलेल्या एकाने देवासी याला पडक्या जागेत नेले.
लक्ष्मण याचा दगडाने ठेचून खून केला. रविवारी दुपारी देवासी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आई-वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात दिली. रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लक्ष्मण याचा खून झाल्याचे उघडकीस आले.
पोलीस ठण्यावर मोर्चा
लक्ष्मण याच्या खुनाची माहिती मिळताच समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. सोमवारी देखील आंदोलन सुरूच ठेवले. जोपर्यंत आरोपीला शोधून अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात न घेता चिखली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या माडंला. तसेच मंगळवारी दिवसाही पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.