पुणे : पुण्यातील एका बिल्डरला बांधकाम बंद करण्यास भाग पाडून 20 कोटी रुपयांचे नुकसान करण्याची भिती घालून एक कोटी रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या सराईत गुन्हेगार राकेश विठ्ठल मारणे (रा. फ्लॅट नं. 604 रिजेंट पार्क, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका बिल्डरने (47) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी राकेश मारणे याच्याविरुद्ध आयपीसी 387, 452,447,504, 506 कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 26 जुलै 2022 ते शुक्रवार (दि.25) दरम्यान सॅलिसबरी पार्क पुणे येथील बांधकाम साईट व ऑफिसमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक यांची सॅलिसबरी पार्क येथे गृहप्रकल्पाची बांधकाम साईट चालू आहे. गृहप्रकल्पाच्या बांधकाम साईटच्या ऑफिसमध्ये व बांधकाम साईटवर आरोपी राकेश मारणे जात होता. त्याठिकाणी राकेश याने फिर्यादी यांना बांधकाम साईटचे काम बंद करण्यास भाग पाडत होता. तसेच बिल्डिंगच्या वरील चार मजले अनाधिकृत असल्याचे सांगून ते पडल्यास 20 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती दाखवत होता. 20 कोटी रुपयांचे नुकसान करुन घ्यायचे नसेल तर एक कोटी रुपये खंडणीची मागणी त्याने केली.
तसेच एक कोटी रुपये खंडणी दिली नाही तर बिल्डिंगच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेत व इतर विविध कार्यालयात खोटा तक्रार अर्ज करण्याची धमकी दिली. याशिवाय मारणे गँगची भिती दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी तक्रारीची सखोल चौकशी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राकेश मारणे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.