विधानसभेत फडणवीस यांचा सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब

पुराव्यांचे सव्वाशे तासांचे चित्रीकरण; राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे

0

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत जोरदार हल्लाबोल केला. सरकारी वकिलांनी विरोधकांना अडकवण्याचा षडयंत्र रचले असून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आपल्याला संपवण्याचा डाव रचण्यात आला आहे.

 

विरोधकांवर खोट्या तक्रारी नोंदवून त्यांना अडकवण्याचा कटही या सरकारने रचला आहे आणि याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत, असा सनसनाटी फडणवीस यांनी केला. यावेळी त्यांनी अध्यक्षांकडे एक पेन ड्राइव्ह सोपवला असून या पेनड्राइव्हमध्ये विविध संभाषणे आणि पुरावे असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार पोलीस दलाचा गैरवापर करत असून हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला नाही, तर न्यायालायात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकविण्याचा नियोजनबद्ध कट आखाण्यात आला होता. त्यासाठी खोटे पुरावे, खोटे पंच आणि खोटे साक्षीदार उभे करण्यात आल्याचा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला आहे. आपल्यासह, चंद्रकांत पाटील, रावल आणि गिरीश महाजन यांना फसवण्याचा डावच आखण्यात आला असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे एक पेन ड्राइव्ह सोपवला. या पेनड्राइव्हमध्ये सव्वाशे तासांचा डेटा असून सगळे पुरावे त्यात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. या व्हिडिओच्या आणि माहितीच्या आधारे 25 ते 30 वेबसिरीजही तयार होऊ शकतील, अशी टिप्पणीही फडणवीस यांनी केली.

या पेन ड्राइव्हमध्ये पोलिस अधिकाऱ्यांचे संभाषण असून ते अनेक भाजप नेत्यांची नावे घेत असल्याचे दिसत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना हाताशी धरूनच सरकार हे कटकारस्थान रचत असल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष सरकारी वकील चव्हाण याचे कार्यालय हे कटकारस्थान रचण्याचे मुख्य ठिकाण असल्याचेही ते म्हणाले.

या पेन ड्राइव्हमधील जर काही भाग आपण सादर केला तर सभागृहाची इज्जत जाईल, असे गंभीर स्वरुपाचे विधानही फडणवीस यांनी केला आहे. सरकार कटकारस्थान कशा प्रकारे शिजवत आहे, याचा पुरावा या पेनड्राइव्हमध्ये असल्याचा गौप्यस्फोटही फडणवीस यांनी सभागृहात केला.

Leave A Reply

Your email address will not be published.