जामीनावेळी घातलेल्या न्यायालयाच्या अटी न पाळने आरोपीला पडले महागात
पोलिसांनी आरोपीला केली पुन्हा अटक
पुणे : जमिनीच्या व्यवहारात रक्कम गुंतविल्यास दामदुप्पट मोबदला मिळेल असे आमिष दाखवून एकाची तीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यांत जामीनावर सुटल्यानंतर आरोपीने न्यायालयाच्या अटींचे पालन केले नाही. तसेच पोलीस ठाण्यात हजेरी लावली नसल्याने आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी हडपसर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
यश प्रकाश फाले ( वय 20, रा.मधुबन कॉर्नर, विठ्ठल अपार्टमेंट, जुनी सांगवी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फरार असलेला रवींद्र ब-हाटेसह परवेज जमादार, शैलेंद्र जगताप, देवेंद्र जैन, प्रकाश फालेसह एकुण ११ जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कैलास शिरसाट (वय 30, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी 2017 ते 2020 या कालावधीत हा गुन्हा घडला.
यश फाले याने मार्च 2020 मध्ये फिर्यादीस फोन करून धमकी दिली आहे. याबाबत न्यायालयाने आवाज नमुना घ्यायचा आहे. गुन्ह्यांत वापरलेला मोबाईल सिमकार्डसह हस्तगत करायचा आहे. तीस लाख रूपयांच्या व्यवहाराबाबत तसेच बँक खात्याबात त्याच्याकडे चौकशी करायची असल्याने सरकारी वकील संतोषकुमार पाताळे यांनी त्याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली. लष्कर न्यायालयाने त्याला जून जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.