फॉरेक्स मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारे बनावट कॉल सेंटर उध्वस्त
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीसांची कामगिरी
वसई-विरार : शेयर मार्केट तसेच फॉरेक्स मार्केट मध्ये मोठया प्रमाणावर परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर शाखेने ही कारवाई केली आहे. तसेच बनावट कॉल सेंटर उध्वस्त केले आहे.
आदिल युसूफ मेमन, हुसेन नोमान बुंदीवाला, हुजेबा अकबर बहरेनवाला, मूर्तजा हुजेमा भांडपुरवाला, अब्देली शबीर इजी, हुसेन शबीर सजीनवाला या सर्वांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; ही टोळी भारतातील अनेकांना फोन करुन, फॉरेक्स ट्रेडिंग करण्यास सांगून फसवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुगल प्ले स्टोयर मधील mts, fq market यासारख्या इतर 5 ते 6 अँपद्वारे शेयर मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते.
गुंतवणूकदाराने पैसे गुंतवल्यानंतर ते काढून त्यांची फसवणूक करत होते. या टोळीने अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त महेश पाटील ,सहायक आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलिस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक संतोष भिसे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून सर्वांना अटक केली. तसेच बनावट कॉल सेंटर उध्वस्त केले.