पुणे : Covid-19Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता नागरिकांना बनावट ई – पासेस तयार करुन देवुन महाराष्ट्र शासनाची व नागरिकांची फसवणुक करणाऱ्यास पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या चालु असलेल्या कोविड -१ ९ महामारीच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा सारख्या वस्तुंचा काळाबाजार करणारे तसेच लोकांना बनावट दाखले किंवा रिपोर्ट देणारे लोकांची माहिती काढुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबत आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत.
कोविड १ ९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केले असुन अत्यावश्यक सेवा व इतर महत्वाचे कामकाजाकरीता परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाणेकरीता महाराष्ट्र शासनाने Covid-19Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन ई – पास संदर्भात ऑनलाईन फॉर्म भरल्याशिवाय परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाणे बंधनकारक केले असुन दिनांक २८/०४/२०२१ रोजी सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर कडील पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके हे कर्तव्यावर हजर असताना त्यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , एक इसम नामे धनाजी गंगनमले रा . भेकराई नगर , फुरसुंगी , पुणे मो.नं. ९ ५६१ ९ ३०६०७ हा हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता आपले स्वतःचे मोबाईल व लॅपटॉप वरुन Covid-19Mhpolice.gov.in या वेबसाईटवर नागरिकांचे फॉर्म भरुन ई – पास हा बनावट बनवुन विक्री केली आहे.
याची खात्री केली असता इसम नामे धनाजी मुरलीधर गंगनमले (२९ वर्षे, रा . फ्लॅट नं . डी -२०३ , दुसरा मजला , विश्वसृष्टी सोसायटी , भेकराई नगर , पापडे वस्ती , फुरसुंगी , पुणे) हा त्याचे राहते घरामध्ये त्याचे स्वतःचे मोबाईल व लॅपटॉपवर Covid19Mhpolice.gov.in या वेबसाईटवरुन ई – पास तयार करुन त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करुन महाराष्ट्र शासनाची व ई – पास धारकाची फसवणुक करुन बनावट ई – पास तयार करुन तो खरा असल्याचे भासवुन त्यावर महाराष्ट्र पोलीसचा लोगो वापरुन ई – पासची विक्री केली आहे. वरील आरोपीविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन , पुणे येथे भादंवि कलम ४२०,४६५,४६८,४७१,४८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ . रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ च्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण , सहा पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर , पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, इरफान पठाण, निलम शिंदे, पुष्पेंद्र चव्हाण, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे यांच्या पथकाने केली आहे .