पुणे : पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांना बनावट टोल पावती देऊन फसवणूक केल्याप्रकरणातील एकाचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी हा आदेश दिला. या गुन्ह्यातील आरोपींनी ५९ लाख ८० हजारांच्या टोलच्या बनावट पावत्या दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
विकास दिनकर शिंदे (रा. सोनगीरवाडी, ता. वाई, जि. सातारा) असे जामीन फेटाळल्याचे नाव आहे. याबाबत अभिजित बाबर (वय ३३, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्यावर एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली.
विकास याचे खेड शिवापुर टोल नाका येथील व्यवस्थापन कर्मचा-यांमध्ये नाव आहे. त्याने पीएसटीआरपीएल यांचा आनेवाडी येथील टोल नाक्यावर कब्जा करत राजकीय दबाव आणत तेथे टोल वसुली चालू ठेवली. लेन नंबर व १६ वरील सॉफ्टवेअरमध्ये बदल करून तेथील सिस्टीमला नवीन प्रिंटर जोडून त्याआधारे खोट्या पावत्या तयार करून प्रवाशांना दिल्या. याद्वारे आरोपींनी १३० रुपयांची पावती देऊन ४६ हजार वाहने सोडल्याचे ऑडीट रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. याद्वारे त्यांनी कंपनीची ५९ लाख ८० हजारांची फसवणूक केली असल्याने शिंदे याचा अटकपुर्व फेटाळावा, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला.