पिंपरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच पुण्यातील वारजे माळवाडी येथे मोठी कारवाई करुन 52 लाखांचा मद्यसाठा जप्त केला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये बनावट स्कॉच व व्हिस्की विक्रीचा पर्दाफाश केला आहे. पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथे केलेल्या कारवाईत 6 लाख 71 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली आहे. दिवाळी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे बनावट दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील झिंजुर्डे चाळीतील पत्र्याच्या खोलीत कमी प्रतीचे मद्य उच्च प्रतिच्या रिकाम्या स्कॉचच्या बाटलीत भरून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता कांजी शामजी पटेल हा उच्च प्रतीच्या स्कॉचच्या रिकाम्या बाटलीमध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य भरताना आढळून आला.