नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील शेतकऱ्यांशी केंद्राची चर्चा झाली. त्यानंतर शेतकरी संघटनांनी आपापसांत चर्चा केली. या बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, ”तिन्ही शेतकरी कायदे रद्द झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. सरकारशी आम्ही चर्चा केली आणि कायदे मागे घ्या, असे स्पष्टपणे सांगितले आहे”, असे शेतकरी नेते हरिंदर पाल लखोवाल यांनी सांगितले.
लखोवाल पुढे म्हणाले की, ”वीज कायदा आणि पेंढा जाळण्यासंदर्भात दंडाच्या मुद्यावर शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारला मान्य आहे. मात्र, केंद्राने स्वतः यावे, असे आमचे म्हणणे आहे. नाही तर आम्ही मागे हटणार नाही. शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केलेले आहे”, असेही त्यांनी सांगितले.
मागील ९ दिवसांपासून पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांनी केंद्राने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन छेडलेले आहे. महामार्ग, राज्याच्या सीमा बंद करण्यात आले होते. तसेच दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रूधूराचा वापर आणि लाठीचार्ज केलेला होता.