दिल्ली : राज्यातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला तर शेतीसंदर्भात नियोजन करणे सोयीचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेऊन वेळेवर कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना भुसे आणि बाळासाहेब पाटील यांनी या वेळी केल्या.
शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते. मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार विभागास देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तालुका-जिल्हा समितीने तातडीने कार्यवाही करावी अशा सूचनाही या वेळी सहकारमंत्र्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जवाटपाची प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावी.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार, संचालक सतीश सोनी आदी बैठकीला उपस्थित होते.