पिंपरी : व्हेंटीलेटर बेड उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाकडून पैसे घेतल्या प्रकरणी स्पर्श हॉस्पिटलच्या आणखी एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तिच्या घरातून दहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाला मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याचा ठेका स्पर्श हॉस्पीटलला देण्यात आला आहे. महापालिकेच्या शाळेत मुख्याद्यापक असलेल्या शिक्षकेसाठी आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये स्विकारल्याचे प्रकरण 29 एप्रिल रोजी समोर आले होते. यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर स्पर्शचे डॉ. प्रवीण जाधव व वाल्हेकरवाडी येथील एका खासगी दवाखान्यातील डॉ. शशांक राळे आणि सचिन कसबे या तीन डॉक्टरांना पिंपरी पोलिसांनी अटक केली असून त्यांना 6 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आरोपी डॉक्टरांकडे अधिक चौकशी करून पोलिसांनी आरोपी डॉ. कसबे याच्या घरातून तीन लाख 10 हजार रुपयांची रोकड जप्त केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता एका महिला डॉक्टरचे नाव त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी महिला डॉक्टरला अटक करून तिच्या घरातून दहा हजारांची रोकड जप्त केली. ही महिला डॉक्टर ऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयातील बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये स्विकारत होती. तिने अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या माध्यमातून दोन रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले असून त्यासाठी तिने दहा हजार रुपये घेतल्याचे तपासात पुढे आले आहे.