मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मोठा झटका बसला आहे.
या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबै बँकेची मध्यवर्ती शाखा फोर्ट परिसरात असल्याने तेथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या प्रकरणात आता प्रवीण दरेकर यांच्यावर काय कारवाई होणार, ते पहावे लागेल.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांची फिर्याद नोंदवून घेत प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवी कलम 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर हे मजूर आणि नागरी सहकार अशा दोन्ही वर्गातून उभे राहिले होते. परंतु निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता.
आपच्या तक्रारीवरुन सहकार विभागाने नोटीस बजावत, आपण मजूर आहात की नाही, अशी विचारणा दरेकर यांच्याकडे केली होती. दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कुटुंबाची मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये असल्याचे दाखवले होते. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमूद केले होते. अखेर सहकार विभागाचे सह निबंधक बाजीवार शिंदे यांनी मजूर म्हणून दरेकर यांना अपात्र घोषीत केले.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर सहकार मंत्रालयाच्या नव्हे तर आम आदमी पक्षाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रवीण दरेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.