माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0

पिंपरी : अर्ध्या बंगल्याचा परस्पर जबरदस्तीने ताबा घेतल्या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे आणि त्यांचे पती वसंत धोंडीबा गावडे यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री गावडे यांच्या पुतण्या आशिष मोरेश्वर गावडे (31 रा. गावडे पार्क, चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आशिष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आशिष यांचे आजोबा धोंडिबा गावडे यांनी 25 वर्षापूर्वी त्यांचा सुरभी नावाचा बंगला फिर्यादी यांची आई आणि चुलते वसंत गावडे यांच्या नावावर केला होता. परंतु वसंत गावडे यांनी फिर्य़ादी यांच्या आईच्या परस्पर बंगला बँकेत गहाण ठेवून 70 लाख रुपये कर्ज घेतले. कर्जाची परतफेड न केल्याने बँक अधिकारी वारंवार घरी येऊ लागल्याने फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह गावडे चेंबर्स येथील जुन्या घरी राहण्यास गेले. तर चुलते वंसत गावडे हे प्रधिरणातील बंगल्यात राहण्यास गेले. वसंत गावडे यांनी सुरभी बंगला कुलमुखत्यार पत्राच्या आधारे स्वत: च्या नावावर करुन घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

वडिलोपार्जित बंगला असल्याने कर्ज फेडण्याबाबत फिर्यादी यांनी चुलते वसंत गावडे यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी बंगल्याच्या किमतीपेक्षा कर्ज आणि व्याज जास्त असल्याने बंगला सोडवणार नसल्याचे सांगितले. अखेर बँकेने सुरभी बंगल्याचा लिलाव (Auction) जाहीर केला. फिर्य़ादी यांनी दोन कोटी 61 लाख रुपये भरुन बंगला लिलावात विकत घेतला. बँकेने बंगला आई, फिर्य़ादी आणि त्यांच्या भावाच्या नावावर केला.

18 सप्टेंबर 2020 रोजी फिर्य़ादी हे सुरभी बंगल्यात राहण्यास आले. 20 सप्टेंबर 2020 रोजी चुलते वसंत गावडे आणि जयश्री गावडे हे दोघे बंगल्यात आले. त्यांनी फिर्य़ादी यांच्या आईला हा बंगला माझ्या वडिलांचा असून तो तू परस्पर स्वत:च्या नावावर कसा करुन घेतला. याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही सर्वजण येथेच राहणार. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. तसेच फिर्य़ादी यांचा भाऊ अमित याला रोहित वंसत गावडे याने मारहाण केली. तसेच जयश्री आणि वसंत गावडे यांनी अर्ध्या बंगल्याचा परस्पर जबरदस्तीने ताबा घेतल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.