पिंपरी : जागेचे खरेदीखत करून देतो, असे सांगून बिल्डरने एका दांपत्याची सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना जानेवारी 2004 ते 7 जुलै 2021 या कालावधीत माण येथे घडली. याप्रकरणी बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईरंग डेव्हलपर्स ऍन्ड प्रमोटरर्सचे अध्यक्ष व मॅनेजिंग डायरेक्टर किझाकुम अब्दुल रशिद (रा. सेनापती बापट मार्ग, शिवाजीनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरचे नाव आहे. कल्पेश महिंद्र मनिआर (वय 47, रा. सांताक्रझ, मुंबई) यांनी शनिवारी (दि. 7) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिआर आणि त्यांच्या पत्नीस आरोपी रशिद याने माणमधील सर्व्हे क्रमांक 362/2 साईरंग वुडस् प्रोजेक्टमधील चार हजार 55 चौरस फूटाचा प्लॉट क्रमांक तीन हा फिर्यादी यांना देण्याचे मान्य केले. सब रजिस्टर कार्यालय, पौड येथे जागेचे खरेदीखत करू देता असे सांगून त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून तीन लाख 24 हजार 400 रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यावर खरेदीखत केले नाही. सदर जागेचा ले-आऊट बदलून त्या प्लॉटची अन्य व्यक्तीला विक्री करीत फिर्यादी यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.