भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ‘फिल्मी स्टाईल’ हनी ट्राप

0
मुंबई : भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बहिणीने फिल्मी स्टाईल हनी ट्राप आखला होता. मात्र पोलिसांना याची कुणकुण लागल्याने तो डाव उधळून लावला. यामुळे एकाचा जीव वाचला.

जून २०२० मध्ये मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी भागात पार्किंगवरून दोन गटात भांडणं झाली. रिक्षावाल्यांच्या दोन स्थानिक गटांमध्ये रिक्षा पार्किंगवरुन टोकाचा वाद झाला. वादाचं पर्यावसन तुफान हाणामारीत झालं. यात मोहम्मद सादिकने २४ वर्षीय अल्ताफ शेखची हत्या केली आणि मुंबईतून पोबारा ठोकला. या हत्येनंतर सादिकने दिल्ली गाठली. अल्ताफच्या हत्येने त्याचं संपूर्ण कुटुंब शोकात बुडालं. त्याच्या बहिणीलाही मोठा धक्का बसला.

बहीण यास्मिनने भावाच्या हत्येचा बदला घेण्याचा मनाशी निश्चय केला. सादिक दिल्लीत लपल्याची माहिती यास्मिनला मिळाली. भावाच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर यास्मिनने मालवणीत भागात राहणाऱ्या फारुख शेख (20), ओवेश नबिउल्लाह शेख (18), मोहम्मद मानिस सय्यद (20), कांदिवलीतील गणेश नगरमध्ये राहणारे निहाल झाकिर खान (32) आणि सत्यम कुमार पांडे (23) या भावाच्या मित्रांशी संपर्क केला. सगळ्यांनी मिळून सादिकच्या हत्येचा कट रचला.

सादिक यास्मिनला ओळखत होता. याची माहिती असल्याने यास्मिनने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट (बनावट खात) सुरू केलं. सादिकशी ओळख वाढवून आधी तिने त्याचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर सादिक प्रेमाच्या जाळ्यात अडकल्याची खात्री झाल्यानंतर यास्मिनने त्याला मुंबईला बोलावलं. ९ जानेवारीला यास्मिनने त्याला आरेतील छोटा काश्मीर गार्डनजवळ भेटायला बोलावलं.

दुपारी सादिक यास्मिनने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर सादिकला धक्काच बसला. तिथे यास्मिनऐवजी अल्ताफचे पाच मित्र त्याला भेटले. त्यांनी त्याला चाकूचा धाक दाखवत अॅम्ब्युलन्समध्ये बसवलं. त्यानंतर त्यांनी त्याला वसई नायगाव परिसरात घेऊन जाण्याचं ठरवलं. तिथेच हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा कट होता. तो पोलिसांनी उधळून लावला.

Leave A Reply

Your email address will not be published.