प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची 58 कोटी पन्नास लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पराग मधु संघवी (वय ४८ रा. इंडस हाऊस, न्यु लिंक अंधेरी पश्चिम) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सचिन जगदीशप्रसाद जोशी (रा. हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपीने ब्रँडच्या नावाचा उपयोग करून अटी व शर्तीचा भंग करून ही फसवणूक केली आहे. जून २०१६ ते जानेवारी २०२१ कालावधीत ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग संघवी प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहेत. काही महिन्यांपुर्वी आरोपी सचिन जोशी यांनी पराग यांच्या प्लेबॉय बिर गार्डन दुकान, कोरेगाव पार्क पुणे, बिहार गार्डनसह हिंदुस्थानात असणा-या वायकिंग मिडीया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सोबत ब्रॅडचा करार केला. मात्र, सचिनने करारामधील अटींचा भंग करून पराग यांच्या कंपनीच्या बोधचिन्हाच्या नावावर मिळालेल्या रकमेचा अपहार केला. त्यासाठी पुर्वनियोजीत कट रचुन खोटी कागदपत्रे बनवुन कंपनीची अंदाजे ५८ कोटी ५० लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस तपास करीत आहेत.