अग्निकांडातील बालकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत थेट बँकेत

0
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत दहा लाख रुपयांची मदत घोषित झाली आहे. त्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये, पंतप्रधान सहाय्यता निधी आणि राज्यपाल स्वेच्छानिधीतून प्रत्येकी दोन लाख तर शिवसेनेच्यावतीने प्रत्येकी एक लाखाची मदत घोषित करण्यात आली होती.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी धनादेशाचे वाटप घटनेच्या दिवशीच करण्यात आले. तर पंतप्रधान व राज्यपालांची मदत थेट संबंधित परिवाराच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन धनादेश देण्यात आले आहेत.

भंडारा दौऱ्यावर बुधवारी आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपयांची मदत घोषित केली. पंतप्रधान व राज्यपालांनी घोषित केलेली ही मदत संबंधितांच्या बँक खात्यात वळती केली जाणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे बुधवारी भंडाऱ्याला आले होते. त्यांनी शिवसेनेच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत घोषित केली होती. या मदतीचे वितरण संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन स्थानिक शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.