पिंपरी : खुलेआम गांजा विक्रीसाठी आणलेल्या महिलेच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निगडी, ओटास्किम मधील सिद्धार्थनगर झोपडपट्टीमधून अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत 5 किलो 126 ग्रॅम गांजा जप्त केला.
याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावळा शिवाजी खाडे (रा. सिद्धार्थनगर, निगडी) आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थनगर झोपडपट्टी येथे एका महिलेकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या घरावर छापा मारून कारवाई केली. त्यात 30 हजार 760 रुपयांचा एक किलो 210 ग्रॅम गांजा आढळला. त्या महिलेने गांजा दुस-या महिलेकडून आणला असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दुस-या महिलेच्या घरी छापा मारला असता तिच्या घरात पोलिसांना एक लाख नऊ हजार 800 रुपयांचा तीन किलो 916 ग्रॅम गांजा आढळला.
दुस-या महिलेने तिच्याकडील गांजा सावळा खाडे यांच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोन्ही ठिकाणी मिळून पोलिसांनी पाच किलो 126 ग्रॅम वजनाचा एक लाख 40 हजार 560 रुपयांचा गांजा जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.