आळंदी : खेड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीघाटावरील भागीरथीकुंड पाण्याखाली गेलं आहे तर भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले आहे.
भक्ती सोपान पुलाला पाणी लागले आहे. पूल कधीही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घाटावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. मावळात आंद्रा धरण परिसरात सलगच्या मुसळधार पाऊसाने इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे.
इंदोरी, निघोजे, देहू, खालुंब्रे, चिखली, मोशी, मोई, कुरुळी, चिंबळी, डुडुळगाव, आळंदी, चऱ्होली गावचे नदी काठ पुराणे भरून गेले असून नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीचे स्वच्छ रूप पाहायला नागरिक गर्दी करत आहेत.
खेड तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून शेती पिकाला याचा फायदा होणार आहे.