पिंपरी : जागेचा बेकायदेशीर ताबा घेऊन कामगारांची गर्दी जमवत विकासकाला व त्याच्या कुटुंबाला धोका निर्माण करण्याची धमकी देणाऱ्यांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 जानेवारी 2022 पासून सुरु होता.
या प्रकरणी सुनिल उत्तम ससार (वय 45, रा. मुळशी) यांनी गुरुवारी (दि.6) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून विशाल कलापुरे, हनुमंत हिरामण भोते, साहिल सुनिल चांदेरे, सुग्रीव हिरामण भोते, अक्षय सुग्रीव भोते, काळुराम भोते व पाच महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सुसगाव येथील सर्वे नंबर 213/4 या क्षेत्रातील 145 आर ही जमीन विकास करारनाम्यानुसार विकसनासाठी घेतली. यावेळी कलापुरेचा जावई काळुराम याने जमिनीवर बेकायेशीर रित्या ऑफीस कंटेनर टाकून जागेचा ताबा घेतला. तसेच, त्याच्या आठ ते दहा कामगारांना घेऊन येऊन परिसरात दहशत निर्माण केली.
वेळोवेळी दमदाटी करत या प्रोजेक्टमधून बाहेर पडा, आम्हाला एनओसी द्या, नाहीतर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना धोका निर्माण होईल, तुमचे काही खरे नाही म्हणून धमकी दिली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.