मुंबई : केंद्र सरकारकडून आदित्य ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामांसह निर्णयांचे ऑडिट होणार आहे. केंद्र सरकारच्या रडारवर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता आदित्य ठाकरेंकडे असलेल्या खात्याच्या ऑडिटमुळे आदित्य ठाकरेंना भाजपने लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
आदित्य ठाकरेंकडील खात्याचे ऑडिट सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिट सुरुही केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यभरातील युवासैनिकांच्या भेटी घेत आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटत एक नवी ताकद उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात त्यांना मिळणार प्रतिसादख् बंडखोराच्या मतदारसंघात होणारी गर्दी ही चर्चेचा विषय होताना दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आदित्य ठाकरेंना समर्थन दर्शवत असून तिथे ते शिवसेनेची बाजू पटवून देत आदित्य ठाकरे शिवसेना पुन्हा भरारी घेईल, असा आशावाद कार्यकर्त्यांत निर्माण करत आहेत. त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.