मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनिल देशमुख यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच सचिन वाझेला देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं समोर आलं आहे. आता त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.
यापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करुन सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे.