मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख आज (ता. १) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी पाच समन्स पाठवले होते. मात्र, देशमुख २ महिने गायब होते.
ईडीच्या समन्स विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयाच याचिका केली होती मात्र, ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर देशमुख आज ईडी कार्यालयात स्वतःहा हजर झाले आहेत. यावेळी देशमुख म्हणाले, सीबीआयचे समन्स आले. मी सीबीआयला जाऊन स्टेटमेंट दिले आहे. अजून ही माझी केस सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. आज मी ईडी कार्यालयामध्ये हजर झालो. परमवीर सिंग यांनी खोटे आरोप केले. ते आज कुठे आहेत, असा सवालही देशमुख यांनी केला.
दरम्यान, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्या नागपूर, मुंबई येथील घरांसह विविध कंपन्यांवर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचानलयाकडून छापेमारी करण्यात आली होती. देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे.
शंभर कोटींच्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर देशमुख गायब झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय देशमुख यांच्या मागावर होती, तसेच ईडीकडून त्यांना चौकशीसाठी वारंवार बोलविण्यात आले होते. त्यामुळे आज अखेर देशमुख यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली.