सातारा : जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघाचे तब्बल 35 वर्ष आमदार राहिलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे गावात येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी 12 वर्षे विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळून महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला. सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली होती.
उंडाळकर यांचे सहकारी क्षेत्रातही मोठे काम आहे. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहाकरी संस्था उभारल्या. त्यांच्या जाण्याने कराड, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. काँग्रेसी विचारधारेशी एकनिष्ठ असलेला नेता अशी उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख आहे.
माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर हे तब्बल 7 टर्म म्हणजेच सलग 35 वर्षे कराड दक्षिणचे आमदार राहिले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चव्हाण विजयी होऊन ते कराड दक्षिणचे आमदार झाले होते.