माजी पोलिस निरीक्षक अन् एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या कार्यालयात, होऊ शकते ‘अँटिलिया’ प्रकरणी चौकशी
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्यानंतर आता याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) केला जात आहे. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचीही NIA कडून चौकशी केली जाणार आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण याशिवाय वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना दिलेल्या विशेष अधिकारांबद्दल एनआयएकडून परमबीर सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार एनआयएच्या कार्यालयात परमबीर सिंग हे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले. तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आता प्रदीप शर्मा यांची देखील NIA कडून चौकशी केली जाणार आहे.
अनिल देशमुखांचा राजीनामा
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडून केली जाणार असल्याने अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
प्रदीप शर्मा यांचे राजकीय कनेक्शन
प्रदीप शर्मा हे राजकारणात सक्रीय झाले. 2014 मध्ये रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी नालासोपारा विधानसभा निवडणूकही लढवली होती.