65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून वाटाघाटी सुरु

0

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करण्यास शिंदे-फडणवीस सरकारला विलंब होत असल्याने चारही बाजूने टीका सुरू झाली होती. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. आता भाजपा आणि शिंदे गटाने मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्या तरी खाते वाटपावरून पुन्हा तिढा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. भाजपाला 27 आणि शिंदे गटाला 15 मंत्रिपदे मिळू शकतात. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा समावेश आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी रात्री दिल्लीत जाऊन अमित शाह यांची मध्यरात्री भेट घेऊन ते मुंबईत परतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत शिंदे यांनी गृह, वित्त व नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या चार महत्त्वाच्या खात्यांपैकी किमान तीन खाती आपल्या गटाला मिळावीत, अशी मागणी केली आहे.

नगरविकास खाते हे शिंदेंकडे द्यावे, पण गृह व अर्थ खाते आपल्याकडेच ठेवावे, असे फडणवीसांचे म्हणणे आहे.
यामुळे तिढा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी विस्ताराने चर्चा करावी, असे अमित शाह यांनी शिंदे यांना सांगितल्याचे समजते.

मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 42 सदस्य असू शकतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगळता 40 मंत्री उरतात. त्यापैकी 26 भाजपाला, तर 14 शिंदे गटाकडे मंत्रिपदे जाऊ शकतात. एखादे मंत्रिपद कमी-जास्तही होऊ शकेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये जी खाती शिवसेनेकडे होती, ती शिंदे गटाने घ्यावीत, असा प्रस्ताव भाजपाने दिला होता. जर असे झाले तर नगरविकास, उद्योग, परिवहन अशी महत्त्वाची खाती शिंदेंकडे जाऊ शकतात. पण गृह आणि अर्थ खाते भाजपाच्या हातात जाईल.

यामुळे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांचा हा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले असल्याने आता त्यांच्या गटाने खूप जास्त मंत्रिपदे आणि महत्त्वाची खाती यासाठी आग्रह करू नये, असे राज्य भाजपाचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.