‘रेमडीसीवर’चा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक

0

पिंपरी : राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि मोठा तुडवडा निर्माण झालेल्या ‘रेमडीसीवर’ या इंजक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 इंजक्शन जप्त केली आहेत.

आदित्य दीपक मेंदर्गी (24, रा. पिंपरी), प्रताप सुनील जाधवर (24, रा.तळेगाव दाभाडे), अजय गुरुदेव मोराळे (27, रा. सांगवी) आणि मुरलीधर सुभाष मारुटकर (24, रा. बाणेर) या चौघांना अटक केली आहे. तर औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सांगवी येथील काटे पुरम चौकात ‘रेमडीसीवर’ या इंजक्शनची विक्री करण्यासाठी तरुण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी करुन त्याच्या इतर तीन साथीदारांना ताब्यात घेतले. यांच्याकडे अधिक तपास केला असता बाणेर येथील कोविड सेंटर मधून अवैधरित्या ही ‘रेमडीसीवर’ची 3 इंजक्शन आणली असल्याचे सांगितले. छापील किंमती पेक्षा जास्त रक्कम घेऊन, डॉक्टरांची कोणतेही चिट्ठी नसताना बेकायदेशीरपणे विक्री केली जात होती.

पोलिसांनी 15 हजार रुपये किंमतीची 3 ‘रेमडीसीवर’ इंजक्शन आणि इतर ऐवज असा 1 लाख 74 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘रेमडीसीवर’ या इंजक्शनचा तुडवडा जाणवत आहेत. अनेक ठिकाणी याचा काळाबाजार सुरु आहे. या परिस्थितीत काळाबाजार करणाऱ्या टोळीवर कारवाई ही महत्वाची आहे. तपास सांगवी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.