पुणे : इन्कम ट्रक्स अधिकारी असल्याचे भासवून ‘स्पेशल २६’ स्टाईलने एका सोनाराला तब्बल ३५ लाख रुपयांना लुटून पळून गेलेल्या ९ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.
व्यास गुलाब यादव (वय ३४, रा. बिहार), शाम अच्युत तोरमल (वय ३१, रा. धनकवडी), भैय्यासाहेब विठ्ठल मोरे (वय ३८, रा. चर्होली), किरणकुमार नायर (वय ३१, रा. भोसरी), मारुती अशोकराव सोळंके (वय ३०, रा. बीड), उमेश अरुण उबाळे (वय २४, रा. भोसरी), अशोक जगन्नाथ सावंत, सुहास सुरेश थोरात (वय ३१, रा. आकुर्डी) आणि रोहित संभाजी पाटील (वय २३, रा. चर्होली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी नंदकिशोर कांतीलाल वर्मा (वय ४१, रा. वेंकटेश क्षितीज सोसायटी, दत्तनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते २७ ऑगस्टच्या पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान घडला.
वर्मा यांचा सोन्याची नथ बनविण्याचा व्यवसाय आहे. ते घरातच नथ बनवून सराफांना पुरवठा करतात. त्यांचा व्यवसाय वाढल्याने ते परिसरातील एक दुकान विकत घेण्याचा विचार करत होते. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याचा आरोपींचा समज झाला. त्यानुसार त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. अभिनेता अक्षयकुमार याचा बहुचर्चित चित्रपट स्पेशल २६ प्रमाणे त्यांनी सोनाराला लुटण्याचा कट आखला.
फिर्यादी व त्यांचे मित्र सोसायटीजवळ थांबले असताना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पांढर्या रंगाच्या कारमधून आरोपी आले. त्यांनी फिर्यादी यांना आम्ही इन्कमटॅक्स अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही टॅक्स भरत नाही. बेकायदेशीरपणे सोन्याचा व्यवसाय करता, सरकारची फसवणूक करता, तुमच्यावर इन्कम टॅक्सची रेड आहे, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी घाबरले. घरातील सर्व कागदपत्रे, कपाटे तपासण्याचा बहाणा केला. घरातील २० लाख रुपयांची रोकड आणि ३० तोळे सोने सील करण्यात आले. ते जप्त केले असे भासवले. त्यानंतर ते सर्व बरोबर घेतले.
फिर्यादी यांनाही गाडीत बसवून पोलीस ठाण्यात जाण्याचा बहाणा केला. घरापासून निघाल्यावर त्यांना स्वामी नारायण मंदिरापर्यंत आणले. तेथे हत्याराचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या खिशातील ११ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढले. त्यांना जीवे मारण्याचा धाक दाखवून गाडीतून उतरवले. त्यानंतर ते ३० तोळे सोने, २० लाख रुपये असा ३५ लाख ११ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले. या संपूर्ण प्रकाराने वर्मा हे घाबरुन गेले होते. त्यांनी दुसर्या दिवशी भारती विद्यापीठ पोलिसांना या घटनेची कल्पना दिली.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींनी लुटलेला ऐवज देखील जप्त केला आहे.