पुणे : कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यासाठी चांगल्या परताव्याचे अमिषदाखवून दोघांची 1.02 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना तळेगाव दाभाडे येथे घडली.
याबाबत जितेंद्र शिंदे (52 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जे बी सी कंपनीचे संचालक राहुल जाखड (रा. चिंचवड), रामहरी मुंडे (रा. चिंचवड), राहुल जाखड यांच्या पत्नी महिला आरोपी (रा. चिंचवड), ऑफिस प्रमुख महिला आरोपी (रा. चिंचवड) हे चार आरोपी आहेत.
त्यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 406, 420, 34 सह कलम 4, 5 महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधि 1999 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेबीसी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड व जेबीसी अग्रोटेक कंपनीचे संचालक राहुल जाखड व रामहरी मुंडे यांनी फिर्यादीकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याकरिता चांगला परतावा मिळवून देतो, असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे फिर्यादी सोबत लेखी एग्रीमेंट करून दिले. फिर्यादीस विश्वास ठेवण्यास भाग पाडून फिर्यादीस रु 59.50 लाख गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याचा परतावा म्हणून रू 33.36 लाख परतावा व 59.50 लाख मुद्दल असे एकूण 92.86 लाख रू.चे चेक दिले.
तसेच फिर्यादीचे मित्र संदीप शिंदे यांच्यासोबत कंपनी लेटर हेडवर एग्रीमेंट करून त्याच्याकडूनही 10 लाख रुपयांची ठेव स्वीकारली. फिर्यादी व शिंदे यांना कोणताही परतावा न देता पुण्यातील कंपनीची सर्व ऑफिस बंद करून आरोपी हे दुबई व इतरत्र परागंदा झाले आहेत. आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मित्र शिंदे यांची एकूण1,02,86,000 रू इतक्या रकमेची फसवणूक केली आहे.