पुणे : पुणे शहरातील गुंतवणुकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. आरोपीने पुणे शहरातील नागरिकांची सुमारे 84 लाख 34 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. गणेश शिवकुमार सागर (47, रा. द्वारका, नवी दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दुबई येथील बिटसोलाईव्हज प्रा. लि. कंपनीच्या पदाधिकारी व इंग्लंड येथिल बुल इन्फोटेक कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी भारतात व भारताबाहेर सेमिनार आयोजित केले. या सेमिनारमध्ये गुंतवणूक दारांना बक्सकॉईन या क्रिप्टो करन्सीमध्ये मार्केटिंग स्किममध्ये गुंतवणूक करायला लावली. त्यासाठी कॅश फिनिक्स नावाचे क्रिप्टो एक्सचेंज तयार करुन स्वतंत्र ब्लॉकचेन विकसीत करुन बक्सकॉईनचा दर वाढून चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सुरु केलेले प्लॅटफॉर्म, प्लॅन्स, वेबवसाईट पोर्टल हे देखील काही दिवसांनी बंद केले. आरोपींनी केवळ पुण्यातीलच नाही तर जगभरातील अनेक लोकांची फसवणूक केली.
पुणे सायबर पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपास करत असताना दुबई येथील बिटसोलाईव्हज प्रा. लि. कंपनीचा पदाधिकारी व गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार हा दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने दिल्ली जाऊन आरोपीची माहिती जमा केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा पत्ता शोधून काढला. आरोपी दिल्लीतील उत्तमनगर येथे पोलिसांना गुंगारा देऊन लपून राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.