शेअर मार्केटमधील मोठ्या परताव्याच्या अमिषापोटी 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक

0

पिंपरी : शेअर मार्केट गुंतवणूक करा, मोठा परतावा मिळेल असे सांगून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. अश्याच प्रकारे पिंपळे सौदागर मध्ये दीड पट परताव्याचे आमिष देत, दोघांची 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पाच ते सात महिन्यात मुद्दल रकमेसहित दीडपट रक्कम परत करण्याचे आश्वासन आरोपीने दिले.

निलेश भालचंद्र जगताप (42, रा. गणेश कॉम्पलेक्स, आंबेगाव बु.) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जितेंद्र सुखलाल मालखेडे (38, रा. निगडी, प्राधिकरण) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र याने फिर्यादी निलेश व त्यांचे नातेवाईक सुर्यकांत काळे यांना शेअर मार्केट गुंतवणूकीतून पाच ते सात महिन्यात मुद्दल रकमेसहित दीडपट रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार फिर्यादी यांनी 94 लाख 80 हजार रूपये आणि काळे यांनी 80 लाख रूपये असे एकूण 1 कोटी 74 लाख 80 हजार रुपये गुंतवण्यासाठी दिले.

सुरवातीला परतावा म्हणून फिर्यादी यांना 37 लाख 82 हजार 121 रूपये आणि काळे यांना 13 लाख 55 हजार रूपये दिले. दोघांना मिळून 51 लाख 35 हजार रूपये मिळाले. त्यानंतर आरोपीला वारंवार संपर्क केला तर त्याने उडवाउडवीची उत्तरे देत भेटण्यास टाळाटाळ केली. आरोपीने दोघांचे 1 कोटी 23 लाख 44 हजार 879 रूपये न देता आर्थिक फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. सागंवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.