पिंपरी : गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून, कोट्यवधी रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून, विश्वास संपादन करुन बांधकाम व्यवसायिकाची 17 कोटी 70 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे बांधकाम व्यवसायिकाची फसवणुकीचा गुन्हा दाखल असणाऱ्यांची एका पोलिसांनी ओळख करुन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बांधकाम व्यवसायिक संदीप सुधीर जाधव (40, रा. कृपा सिंध बंगलो, बाणेर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तर दिपक सखाराम कोहकडे, पत्नी भारती दिपक कोहकडे, अश्विनीकुमार दिपक कोहकडे (बालेवाडी), अनंता भिकुले (बालेवाडी), स्नेहल ओसवाल (वानवडी), हर्षद अशोक कुलकर्णी (कोथरुड) आणि आशिष ताम्हणे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; व्यवसायिक आणि पुणे पोलीस दलातील पोलीस हवालदार सुनील सुदाम पवार यांची ओळख होती. हवालदार सुनील पवार यांनी त्यांच्या ओळखीचे दीपक कोहकडे यांची आणि जाधव यांची ओळख करुन दिली. त्यानंतर विश्वास संपादन झाल्याने गुंतवणूक करण्याचे ठरले.
जाधव यांनी कोहकडे आणि त्यांच्या इतर साथीदारांकडे करोडो रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही वेळा परतावा चांगला देऊन विश्वास संपादन केला. त्यामुळे जाधव यांनी मोठी गुंतवणूक केली. या गुंतवणूकीवर परतावा देण्याबाबत लेखी नोटराईझ करारनामा करून दिले. याबाबत सुमारे 11 करारनामे करण्यात आले. मात्र शेवटी केलेल्या करारनाम्यानुसार व्यवहार पूर्ण केला नाही. ठरलेला परतावा दिला नाही.
कोहकडे यांनी वारंवार टाळाटाळ केली. कोहकडे यांनी देश-विदेशात स्वतःची गुंतवणूक केली. तसेच जाधव यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली. त्यामध्ये काही झाल्यास, मृत्यू झाल्यास हे माझे मृत्युपत्र समजावे असे नमूद करुन धमकी दिली.
याबाबत जाधव यांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.