पिंपरी : व्यवसायामध्ये दोन कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगून, कंपनीच्या व्यावसायिक नफ्याचे पैसे न देता गुंतवणूकदाराची दोन कोटींची फसवणूक केली. ही घटना 25 जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत के एस बी चौक, चिंचवड येथे घडली.
पांडुरंग निवृत्ती सुतार (60, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी 25 डिसेंबर 2021 रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गजानन मारुती शेटे (52), करुणा गजानन शेटे (42, दोघे रा. चिखली प्राधिकरण), इंडस टॉवर कंपनीचे महाराष्ट्र / गोवा विभागाचे तत्कालीन संबंधित अधिकारी, कॅनरा बँक चिंचवड शाखेचे तत्कालीन मॅनेजर आणि इतर अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन आणि करुणा यांनी त्यांच्या नावे असलेल्या श्री दत्त फॅब्रिकेटर्स प्रोप्रायटर्स या फर्ममध्ये फिर्यादी यांना दोन कोटी रुपये गुंतवणूक करण्यास लावले. त्यानंतर फर्मचे रूपांतर भागीदारी संस्थेत केले. कंपनीने तयार केलेला माल इंडस टॉवर कंपनीला विकला. इंडस टॉवर कंपनीचे तत्कालीन अधिकारी आणि कॅनरा बँकेचे मॅनेजर व इतर अधिकारी यांच्याशी संगनमत करून आरोपींनी इंडस टॉवर कंपनीकडून येणारे पैसे श्री दत्त फॅब्रिकेटर्स प्रोप्रायटर्सच्या जुन्या बंद झालेल्या खात्यावर जमा करून घेतले. भागीदारी संस्थेतून झालेल्या व्यवसायातून आलेल्या रकमेची आरोपींनी फिर्यादी यांच्या परस्पर विल्हेवाट लावून त्यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस पांचाळ तपास करीत आहेत.