पिंपरी : चांगला फायदा देतो असे सांगून भिशीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडून महिलेची तब्बल 23 लाख 74 हजार 999 रुपयांची फसवणूक करण्यात आली. बोपोडीत हा प्रकार घडला असून खडकी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेलुकूलम दामोदरन श्रीनिवासन, सीमा मेलुकूलम श्रीनिवासन, वरून मेलुकूलम श्रीनिवासन (सर्व रा केरळ) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्योती पंकज अगरवाल (47) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला भिशीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या या आमिषाला बळी पडून फिर्यादीने 2015 पासून तब्बल 47 लाख 49 हजार 998 रुपये आरोपीला दिले.
परंतु आरोपींनी त्यातील काही रक्कम परत केली आणि 23 लाख 74 हजार 999 रुपये परत न करता फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली आणि कुठेतरी पळून गेले आहेत. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.