पुणे : पुण्यातील वैद्यकीय कॉलेजमध्ये मुलांना प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने दोन डॉक्टरांची तब्बल 90 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोन भामट्यांना नऱ्हे येथून अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.23) दुपारी दोन ते साडेचार या दरम्यान काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज नऱ्हे येथे घडला आहे.
महेंद्र बेदिया एस/ओ धर्मनाथ (31, रा. झारखंड), करण गौरव एस/ओ रविंद्रकुमार सिन्हा (31, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रामचंद्र रखमाजी साळुंके (48 रा. नवले मेडिकल कॉलेज स्टाफ क्वार्टर, एम बिल्डींग, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उप निरीक्षक अमोल काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी डॉ. शिवाजी शेंडगे व डॉ. भास्कर जाधव यांना फोन करुन संपर्क साधला. त्यांना पुण्यातील नऱ्हे येथील काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या मुलांचे कॉलेजमध्ये अॅडमिशन करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी दोघांकडून प्रत्येकी 45 लाख असे एकूण 90 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. कॉलेजचे नाव घेऊन फसवणूक करुन कॉलेजची बदनामी केल्याप्रकरणी रामचंद्र साळुंके यांनी तक्रार दिली आहे.
आरोपी हे काहीही कामधंदा करत नाहीत. ते नऱ्हे येथे राहत असून लोकांना लिंक पाठवून किंवा त्यांना फोन करुन त्यांच्याशी संपर्क साधत होते. त्यांचे नऱ्हे येथे कॉलसेंटर नसून मुंबईत कॉलसेंटर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार पोलीस तपास करत असल्याचे पोलीस उप निरीक्षक अमोल काळे यांनी सांगितले.