पुणे : ग्रँड विवांता व्हेकेशन प्रा. लि. कंपनी मार्फत फ्री गिफ्ट हॉलिडे व्हाउचर बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ग्रँड विवांता व्हेकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर दीपक जोशी, राजकुमार, निवास नंदकिशोर आनंद, सागर बदाम सिंग चौधरी, ब्रिजेश कुमार मोहन झा, इसरल अब्दुल अजिज अहमद (सर्व रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ग्रँड विवांता व्हेकेशन प्रायव्हेट लि. कंपनी मार्फत फ्री गिफ्ट हॉलिडे व्हाउचर बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून लोकांना कंपनीचे वाउचर लागल्याचे खोटे सांगून हॉटेल रमाडा येथे बोलावून घेत असत. त्यानंतर लोकांना कंपनींचा मेंबर होण्यासाठी आग्रह करून त्यांना वेगवेगळ्या देशात व राज्यात प्रवास करून तेथे असणाऱ्या फोर स्टार व फाईव्ह स्टार हॉटेलचे मार्केटिंग हक्क आमच्याकडे असून लोकांना स्वस्तामध्ये राहण्याचे आमिष दाखवले जात. लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या अकाउंट मधून कार्ड स्वाइप करून त्यांची फसवणूक केली जात असे.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहणी करून खात्री केली. त्यानंतर आरोपींकडे कुठल्याही फोर स्टार व फाईव्ह स्टार हॉटेलचे मार्केटिंग हक्क नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रँड विवांता व्हेकेशन प्रायव्हेट लि. कंपनी कडून कुठलेही अमिष दाखवून फसवणूक झाली असल्यास संबंधित नागरिकांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.