आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी, भारतात भाववाढ का ? : मेहबूब शेख
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरीत इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
पिंपरी : आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी असताना भारतात पेट्रोल, डिझेल आणि गॅसची वारंवार भाववाढ का ? असा प्रश्न राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपस्थित केला आहे.
सोमवारी (दि. 11 जानेवारी) केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. शैलेश मोहीते, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, पुणे युवक शहराध्यक्ष महेश हांडे, पुणे जिल्हा युवक शहराध्यक्ष सचिन घोटकुले, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, संदिप लाला चिंचवडे, प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक बोके, किशोर मासाळ, अजय आवटी, नगरसेवक पंकज भालेकर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप तसेच प्रदेश युवक आणि शहर युवकचे सर्व पदाधिकारी बहुसंख्य युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेहबूब शेख पुढे म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन केंद्रात सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार रोज पेट्रोल, डिझेल व गॅसचे दरवाढ करीत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जागतिक महामारीमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. नुकतेच अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणा-या नागरीकांचा उद्योग, व्यवसाय सुरु झाला आहे. त्यात रोजच होणा-या पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटले जात आहे अशी टिका शेख यांनी केली. ‘वारे मोदी तेरा खेल, सोने के भाव मे बिकता तेल’ अशा घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.