चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करुन फरार असणारा तीन वर्षानंतर अटकेत

0

पिंपरी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवुन तिचा खुन करुन फरार झालेला आणि स्वतःचे अस्तित्व लपविण्यात तरबेज असलेल्या आरोपी पतीला वाकड पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आपल्या पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करुन हा आरोपी पती फरार झाला होता. मारहाण केल्याची हि घटना (ता.23) सप्टेंबर रोजी सदगुरु कॉलनी, थेरगाव येथे घडली होती. मात्र, सहा दिवसांनी म्हणजे (ता. 29) सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान जखमी पत्नीचा मृत्यू झाला. कोणताही ठोस पुरावा हाती नसताना वाकड पोलीसांनी केलेल्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कौतुक केले आहे.

बाळासाहेब किसन जाधव (51 वर्ष, रा. सदगुरु कॉलनी, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर सुनिता बाळासाहेब जाधव असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलीने फिर्याद दिली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत दिलेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीची हत्या केली असल्याची घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथे घडली होती.

घटना घडल्यानंतर आरोपी पती हा अंगात केवळ बनीयान आणि बरमुडा वर पळुन गेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने दोन तपास पथकं आरोपीच्या शोधात रवाना करण्यात आले. आरोपीकडे मोबाईल फोन अथवा तो कोणत्याही नातेवाईकांच्या संपर्कात नसल्याने त्याला शोधण्यासाठी अडचणी येत होत्या. तसेच तो स्वतःचे अस्तित्व लपविण्यात तरबेज असल्याने त्याला शोधणे पोलीसांसमोर एक प्रकारे आव्हान निर्माण करणारे असे झाले होते.

पोलीसांनी आरोपी बाबत अधिक माहिती घेतली असता त्याचे दोन विवाह झाले असल्याची माहिती मिळाली. पहिल्या पत्नीचे नाव सुनिता (मयत) व दुसरी पत्नी संगिता असे होते.
मयत सुनिता सोबत आरोपी बाळासाहेब याचा विवाह 1998 मध्ये झाला होता. त्यांना चार मुले आहेत. आरोपी हा घरात भांडण करीत असे. भांडण झाल्यानंतर तो दुसरीकडे पळुन जावुन स्वतःचे खोटे नाव धारण करुन ओळख लपवुन राहत असे. असेच मयत सुनिता सोबत भांडण झाल्यानंतर तो सोलापुर वरुन कोल्हापुर जिल्ह्यातील एका गावात 07 वर्ष अनाथ असल्याचे सांगुन घरगडी म्हणुन काम करीत राहत होता. मात्र, गावातील एका माणसाने त्याला ओळखल्याने पुन्हा त्याला मुळगावी आणण्यात आले होते. सन 2015 मध्ये पुन्हा मयत सुनिता आणि आरोपी बाळासाहेब यांच्यामध्ये भांडण झाले. त्यावेळी आरोपी बाळासाहेब पुण्यातील आंबेगाव, खुर्द येथील एका गोठ्यात अनाथ असल्याचे सांगत कामास राहिला होता. आंबेगाव येथे तो साडे तीन वर्ष लपुन राहिला.

अशा प्रकारे आरोपी पळुन जावुन स्वतःचे अस्तित्व लपविण्यात तरबेज झाला होता. गवंडी, प्लंबर, पेंटींग, वॉटर प्रुफिंग अशा प्रकारची मिळेल ती कामे तो करीत असे. दरम्यान, तो कोणाशीही संपर्क साधत नसल्याने पोलीसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. उपचार दरम्यान सुनिता हिचा मृत्यू झाल्यानंतर पोलीसांनी आरोपी बाळासाहेब याला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा गतीमान केली. कोल्हापुर, सोलापुर येथे आरोपीचा शोध घेतला. आरोपीचे मोस्ट वान्टेड म्हणुन जागोजागी गर्दीच्या ठिकाणी पोस्टर्स लावले.

आरोपीचे शोधकार्य सुरु असताना पोलीस अंमलदार प्रशांत गिलबिले यांना माहिती मिळाली की, कात्रज येथील नवले ब्रीज जवळ आरोपीच्या वर्णन जुळता एक इसम आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र, आरोपी तेथुन निघुन गेला होता.

वाकड पोलीसांनी मात्र, संयम ढळु न देता सलग 10 तास सापळा रचुन आजुबाजुचा परीसर पिंजुण काढत आरोपी बाळासाहेब याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन केला असल्याची कबुली पोलीसांना दिली. आरोपीस सोमवार (ता.11) रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला रविवार (ता.17) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस अंमलदार प्रशांत गिलबिले, बिभीषन कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दिपक साबळे, वंदु गिरे, प्रमोद कदम, अतिष जाधव, विजय वेळापुरे, कल्पेश पाटील, बाबा चव्हाण, कौतेय खराडे, तात्या शिंदे व नुतन कोंडे यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.