मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज मुंबई पोलिसांपुढे हजर झाले. गोरेगाव येथे दाखल करण्यात आलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासंदर्भात तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंह आज थेट कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या कक्ष 11 मध्ये हजर झाले. त्यांची तब्बल 7 तास चौकशी झाली असून त्यांनी सर्व आरोप फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती बुधवारी समोर आली होती. आपण देशातच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यास दोन दिवसांत चौकशीला हजर राहू, असे परमबीर सिंह यांनी कोर्टात वकिलांमार्फत स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.
कोर्टाच्या निर्णयानंतर परमबीर सिंह आज मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथे सहा गुन्हे दाखल आहेत. आपल्याविरोधात मुंबईत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. आता परमबीर सिंह परतल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.