परमबीरसिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ

0

मुंबई :  माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 5 लाख रुपयांची लाच दिल्याचा सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याविरोधात एनआयएने चार्जशीट दाखल केले आहे. सचिन वाझे याच्यासह 10 जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्यामागे काय हेतू होता? याचा खुलासा केला आहे.  

परमबीरसिंह यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, त्यांनी अहवालात बदल करण्यास सांगितले होते, असा दावा अँटिलिया बॉम्ब प्रकरणी मुंबई पोलिसांसोबत काम केलेल्या एका सायबर तज्ज्ञाने केला आहे. या प्रकरणात जैश-उल-हिंदचे पोस्टर जोडणे आवश्यक असल्याचे म्हणत परमबीरसिंह यांनी या कामासाठी पाच लाख रुपये देण्याचे वचन दिले होते, असेही या तज्ज्ञाने म्हटले आहे. त्यामुळे अँटिलिया प्रकरणाला वेगळे लागले आहे. तसेच परमबीरसिंह हे आता आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणांमध्ये  NIAच्या आरोपपत्रात या सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या तज्ज्ञाने 25 फेब्रुवारी रोजी या घटनेची चौकशी करून मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या आढळल्या होत्या. या कृत्याची जबाबदारी जैश-उल-हिंद नावाच्या एका संघटनेने टेलिग्राम चॅनेलवर स्वीकारली होती. मार्च 2021 मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएला सोपवण्यात आला होता.

NIAच्या तपासादरम्यान, एका सायबर तज्ज्ञाने सांगितले की, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात 9 मार्च रोजी त्याने मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची भेट घेतली होती. यावेळी आपण या वर्षी जानेवारीमध्ये इस्रायल दूतावासाबाहेर झालेल्या स्फोट प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला मदत केली होती, असे सिंह यांना सांगितले होते. तसेच जैश-उल-हिंदने तिहाड जेलमधील एका फोन नंबरबर टेलिग्रामवर या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, असे सांगितले. 

Leave A Reply

Your email address will not be published.