पुणे : उद्धव ठाकरेंविरोधातील नाराजीचा फायदा उचलत भाजपने शिवसेनेत फूट पाडून अडीच वर्षांतच एकनाथ शिंदेंच्या मदतीने महाराष्ट्रात पुन्हा आपली सत्ता स्थापन केली. मात्र आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी “२०२४ मध्ये आपल्याला दुसऱ्याच्या कमजोरीवर नव्हे तर स्वबळावर सत्ता प्राप्त करा,’ अशा शब्दांत नेत्यांचे कान टोचले.
प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक गुरुवारी पुण्यात झाली, या वेळी नड्डा यांनी मार्गदर्शन केले. केंद्रात भाजपचे सरकार आल्याने २०१४ पासून देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. विविध योजनांच्या लाभार्थींना थेट लाभ मिळू लागले. रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त झाल्या. ही कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांची आहे. १० लाख ४० हजार बूथपर्यंत पोहोचून तिथे पक्ष मजबूत करण्याचे लक्ष्य गाठायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
‘कर्नाटक पॅटर्न’ची चर्चा असली तरी राज्यात असा कोणताही पॅटर्न चालणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करून मते मिळवणे इथे चालणार नाही. आपल्याकडे फक्त मोदी पॅटर्न, शिवरायांचा पॅटर्न चालेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘पक्षासाठी त्याग करायची तयारी ठेवा. तुम्ही सांगितले तर मीही पद सोडायला तयार आहे, एक वर्ष घरही सोडायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का?’ असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. पुढील वर्षभर कुणीही पद मागू नका, असे सांगतानाच आमदारांना उद्देशून ते म्हणाले, घाबरू नका, लवकरच आपण मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत.
कार्यकारिणी बैठकीनंतर नड्डा यांनी राज्यातील भाजपचे मंत्री, आमदार व खासदार यांची स्वतंत्र बैठक घेतली. वर्षभरावर निवडणुका आहेत. त्यामुळे मतदारसंघात संपर्क वाढवा, विकासकामांचा धडाका लावा व केलेल्या कामांचा प्रचार करा. कोणत्याही परिस्थितीत भाजपला यश मिळालेच पाहिजे, अशा सूचना त्यांनी लोकप्रतिनिधींना दिल्या.