नामांकित बँकेतील खात्याची माहिती चोरून, विक्री करणाऱ्या टोळीला अटक
पुणे पोलिसांच्या 'सायबर सेल'ची मोठी कामगिरी
पुणे : नामांकित बँकेत वर्षानुवर्षे पडून असलेले खाते (डोरमंट अकाउंट – unclaimed account) आणि काही ऍक्टिव्ह बँक खात्याची माहिती चोरून ती विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक केली आहे. ही कामगिरी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 4 आयटी इंजिनिअरसह महिलांचा समावेश आहे.
रविंद्र महादेव माशाळकर (34, अंबाजोगाई रोड, लातूर), आत्माराम हरिश्चंद्र कदम (34, मुंबई), मूकेश हरिश्चंद्र मोरे (37, येरवडा), राजशेखर यदैहा ममीडा (34, हैदराबाद), रोहन रवींद्र मंकणी (37, सहकारनगर), विशाल धनंजय बेंद्रे (45, वाशीम), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (54, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (42, औरंगाबाद), परमजित सिंग संधू (42, औरंगाबाद) व अनघा अनील मोडक (40, वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार फसवणूक व चोरीप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी संगणमत करून काही नामांकित बँकातील डोरमंट अकाउंट (निष्क्रिय खाते) आणि काही ऍक्टिव्ह बँक खात्याची माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. या सर्व बँक खात्यात जवळपास 216 कोटी 29 लाख रुपये होते. दरम्यान, ही पूर्ण माहिती चोरल्यानंतर ते एका व्यक्तीला विक्रीच्या तयारीत होते. दरम्यान याची माहिती पुणे सायबर सेलला मिळाली. यानंतर सायबर पोलीस गेल्या आठ दिवसापासून या टोळीच्या मागावर होते. त्यानुसार सिंहगड रोड परिसरात सापळा रचून पकडण्यात आले. प्राथमिक तपास केल्यानंतर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. छापेमारी करत पोलिसांनी या टोळीला एकाच ठिकाणी पकडले आहे. यावेळी 11 मोबाईल फोन, रोख 25 लाख, 1 क्रेटा, डस्टर कार व एक मोपेड असा तबल 43 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील एका बड्या हस्तीला ही माहिती व पैसे विक्री करण्यात येणार होते. त्याची मीडियेटर अनघा मोडक होती. त्यानुसार 25 लाख देऊन जवळपास अडीच कोटींचा डाटा विक्री करण्यात येणार होता. या व्यक्तीला देखील पोलिसांनी नोटीस दिली असून, तो एका न्यूज चॅनेलचा मालक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सहभाग आढळल्यास किंवा त्याला हा चिटिंगचा पैसा आहे हे माहिती असताना तो यात व्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार वाघचौवरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व त्यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करत आहेत.